---Advertisement---

राजा भिंगे हत्या प्रकरणाचा उलगडा; पाचही आरोपी अटकेत!

Follow Us:
---Advertisement---

पंढरपूर वृत्तसंस्था : शिवा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र (राजा) भिंगे यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूलही पोलिसांनी जप्त केले आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.

18 नोव्हेंबर रोजी पंढरपूर शहरात राजेंद्र भिंगे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 2017 मध्ये पंढरपूरचे माजी नगरसेवक नामदेव भोईटे यांची हत्या झाली होती. या प्रकरणात राजेंद्र भिंगे हे मुख्य आरोपी होते. नुकतीच त्यांची या खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली होती. याच हत्येचा बदला घेण्यासाठी भिंगे यांची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या हत्येसाठी पुण्यातील हडपसर येथून रोहन नागे नावाचा शूटर बोलावण्यात आला होता. त्याने काही दिवस पंढरपूरमध्ये राहून भिंगे यांची रेकी केली होती. जेवणानंतर भिंगे एकटेच शतपावलीसाठी बाहेर पडतात, याची माहिती मिळाल्यानंतर दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दुसऱ्याच दिवशी दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर तपासात उर्वरित आरोपी गुजरातमार्गे राजस्थानकडे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने गुजरातमधील सोमनाथ येथून तीन आरोपींना अटक केली.

या प्रकरणात प्रवीण उर्फ तात्या शिंदे (रा. झेंडे गल्ली, पंढरपूर), वैभव ज्ञानेश्वर फसलकर, अनिकेत गवळी, स्वप्नील आहेरे आणि रोहन नागे या पाच जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या सर्व आरोपी पोलीस कोठडीत आहेत.

दरम्यान, या हत्येमागे आणखी कोणाचा सूत्रधार म्हणून सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. पाचही आरोपींच्या अटकेमुळे राजा भिंगे हत्या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!