ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकलच्या वेळापत्रकात बदल करणार ; राजेश टोपे

मुंबई : कोरोना महामारीमुळे बंद असलेली मुंबई लोकलची दारं 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. पण प्रवासासाठी काही वेळा निर्धारित करुन देण्यात आल्याने याबाबत मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईकरांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी एक महत्वाचं विधान केलं आहे. “लोकांचं हित आणि गरज पाहून सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकल सेवेच्या वेळापत्रकात आवश्यक बदल करण्यात येतील”, असं राजशे टोपे म्हणाले. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते.

 

मुंबईची लोकल सेवा कालपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरू झाली असली तरी पहाटे पहिल्या लोकलपासून ते सकाळी सात वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत आणि रात्री ९ नंतरच सर्वसामान्य नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे सकाळी ७ नंतर ते दुपारी १२ पर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या वेळेत सर्वसामान्यांना प्रवास करता येत नाहीय. शासनाच्या या वेळापत्रकावर मुंबईकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

 

मुंबईकरांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी लवकरच नागरिकांना दिलासा दिला जाईल अशी माहिती दिली आहे. “लोकलची व्यवस्था ही सर्वांसाठीच अतिशय महत्वाची आहे. लोकलच्या वेळात काही सुधारणा होण्यासारखी असेल तर नक्कीच आमच्या विभागाकडून आम्ही याचा पाठपुरावा करू. शेवटी लोकांचं हित हाच सर्वात महत्वाचा विषय आहे. जनतेची गरज आणि हित ओळखूनच सरकार निर्णय घेईल”, असं राजेश टोपे म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!