---Advertisement---

दिवाळीत अमरावतीत तरुणाची हत्या; भंडाऱ्यात वाघाच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू

Follow Us:
---Advertisement---

अमरावती, वृत्तसंस्था ; दिवाळीचा सण सुरू असतानाच अमरावती आणि भंडारा जिल्ह्यांत दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. अमरावती शहरात धारदार शस्त्राने वार करून एका तरुणाची हत्या करण्यात आली, तर भंडारा जिल्ह्यात शेतात भातकापणी करत असताना वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. या घटनांमुळे दोन्ही जिल्ह्यांत खळबळ उडाली असून शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमरावती शहरातील गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महेंद्र कॉलनी येथील पांढरी हनुमान मैदानावर ही हत्या झाली. राजेंद्र कचरे ऊर्फ निक्कू याच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. हल्लेखोर कोण होते आणि हत्येमागचे नेमके कारण काय, याचा तपास गाडगेनगर पोलीस करत आहेत.

दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील ब्राम्हणी गावाच्या शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात २६ वर्षीय कुणाल युईके याचा मृत्यू झाला. कुणाल हा आई-वडिलांसोबत शेतात भातपिकाची कापणी करत होता. यावेळी झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्याच्यावर झडप घातली. आई-वडिलांसमोरच वाघाने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. भेल प्रकल्पासाठी अधिग्रहित केलेल्या जागेच्या मागील बाजूस हे गाव आहे.

विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी लाखांदूर तालुक्यातील दोनाड येथे आई-वडिलांसोबत शेतात गेलेल्या पाच वर्षांच्या बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याचा जीव घेतला होता. दिवाळीच्या काळात भंडारा जिल्ह्यात हिंस्र वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्याने शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!