अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : दहिटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सागर कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच नितीन मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवड प्रक्रियेत एकूण ११ पैकी १० सदस्य उपस्थित होते. निवडणूक अधिकारी इंगळे यांनी शासनाच्या नियमानुसार आवश्यक गणपूर्ती झाल्याने निवड प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले.
गावातील प्रत्येक सदस्याला उपसरपंचपदाचा मान मिळावा, या उद्देशाने सरपंच नितीन मोरे यांनी २०२३ पासून दरवर्षी नवीन उपसरपंच निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आजपर्यंत तीन सदस्यांना या पदाची संधी देण्यात आली आहे. ठरलेल्या नियोजनानुसार ५ नोव्हेंबरला मावळते उपसरपंच राजीनामा देतात आणि नव्या उपसरपंचाची निवड केली जाते. यावेळी मावळते उपसरपंच शरणू कोळशेट्टी यांनी पदाचा कार्यभार सोपविला.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्यामुळे गावाला आतापर्यंत सुमारे दोन कोटी रुपयांचा विकासनिधी मिळाल्याचे सरपंच मोरे यांनी सांगितले. या निधीतून गावाच्या विकासाला गती मिळाल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अंबुताई कटकधोंड, शहनाज मुजावर, दादा शेख, विकी चौधरी, सत्यवती कोळी, लोचनाबाई जाधव, गोपाळ शिरसागर, चंद्रकला कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अरुण पोपसभट, पोलीस पाटील भीम म्हेत्रे आदी उपस्थित होते.









